Wednesday, January 6, 2016

व्यक्तीनिष्ठा वा विचारनिष्ठा?

आज चर्चा करत असताना मित्रास म्हणालो "आपण माणूस बघून त्याचे विचार मान्य करतो आणि दुर्दैवाने विचारांकडे बघून माणसास मान्य करत नाही"

कितीही नाही म्हणलं तरी एखाद्या व्यक्तीस पूज्य रुपी मानून त्यास आपल्या डोक्यावर बसवणे हा मनुष्य स्वभावच आहे. अर्थात तो माणूस काहीतरी त्या क्षमतेचा असल्याशिवाय हे होणे शक्य नाही हेही मान्य! एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्या मनास भिडतात तेव्हाच आपण त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतो. जेव्हा त्या व्यक्तीचे अनेक विचार आपल्या मनांस पटावयास लागतात तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे आदराने बघू लागतो आणि त्याचे सगळेच विचार पटावयास लागतात तेव्हा आपण त्यास पूज्य रुपी मानून त्याचा कुठलाच शब्द खाली पडू देत नाही आणि त्याचा प्रत्येक विचार शिरसावंद्य मानून घेतो.

थोडक्यात ज्याचे विचार आपल्या मनास भिडतात म्हणून आपण ज्याचे ऐकावयास प्रारंभ केला त्याचे आपल्या नकळत सर्व विचार आपण श्रेष्ठ मानून तेच प्रमाण मानावयास सुरुवात करतो. हा केवढा विरोधाभास म्हणावा? आणि याच क्षणी वेड्या भक्तीस प्रारंभ होतो. आपले थोडीफार का होईना परंतु स्वतंत्र विचार करायचे जे सामर्थ्य असते ते आपण आपल्या नकळत हरवून बसतो. यात त्या विचारकर्त्याचा कुठल्याही परीने तोटा होत नसून आपण आपल्या स्वतंत्र विचारशैलीस ठेचीत असतो.

जेव्हा मनुष्य विचार हे प्रमाण मानावयास तयार असतो तेव्हा तो केवळ एका मनुष्याचे विचारच प्रमाण मानावयाची चूकभूल न करता सर्व विचारांस आपल्या मनाच्या दरबारी अगत्याचे आमंत्रण देऊन त्यांचा पाहुणचार करू शकतो आणि पुढल्या वेळेस कोणत्या विचारांस आपल्या ओसरी बाहेरचे स्थान द्यायचे आणि कोणत्या विचारास सन्मानपूर्वक वागणवूक द्यावयाची याचा ताळमेळ राखू शकतो आणि अशाच वेळेस विचार कर्त्यास महत्व न देता विचारास महत्व दिले जाते.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ज्याचे विचार योग्य आहेत त्याचे "सगळेच" विचार कायमच योग्य आहेत हे मानण्याचा दुराग्रह का? प्रत्येक गोष्टीत कमी जास्ती, योग्य अयोग्य हे चालायचेच. काही विचार अगदी आपल्यास पूजनीय असलेल्या व्यक्तीचे सुद्धा चुकीचे असू शकतात आणि काही विचार आपल्यास इतरार्थी न भावणाऱ्या व्यक्तीचे देखील योग्य असू शकतात परंतु ते मान्य न करण्याचा दुराग्रह का म्हणून ठेवावा?

एखाद्या व्यक्तीचा एखादा विचार मान्य न होणे म्हणजे ती संपूर्ण व्यक्तीच मान्य न होणे असा निष्कर्ष काढणे हे देखील आततायी पणाचे लक्षण मानावे. सूर्यावर सुद्धा काळे डाग आहेत, परंतु त्या डागांमुळे सूर्याची ओळख होत नाही, तर तो अवकाश आपल्या तेजाने व्यापून टाकतो म्हणून वंदनीय मानला जातो. 

श्रद्धा ही विचारांवर असावी की व्यक्तीवर? साहजिकच म्हणायचे झाले तर ती विचारांवर असावयास हवी. संकोचित वृत्ती धरून आमचेच ताट भरलेले असे एकदा मनाने पक्के केले की मग शेजारी पंचपक्वान्नांच्या जेवणाचे खुले आमंत्रण असून देखील आमच्या येथल्या ताटात एक तांदळाचे शीत जरी वाढले तरी त्यास मन पूर्ण आहार मानून मोकळे होते. हा दुराग्रह का ठेवावा?

मनुष्यास विचार करण्याची संपदा प्राप्त झाली असताना ती मनाची कवाडं कायम उघडी ठेवून सतत विचारांचा प्रवाह खेळता ठेवण्यात शहाणपण नाही काय?


जे जेथे ज्या रुपात आहे परंतु चांगले आहे ते पदरात घ्यावे; आणि जे वाईट, चुकीचे, कालबाह्य आहे ते कितीही हद्याच्या जवळचे असले तरी टाकून द्यावे. गैर गोष्टींना कवटाळून बसण्यात आपलेच नुकसान आहे हे लक्षात घ्यावे.

No comments:

Post a Comment